Friday, October 9, 2026

 गेली कित्येक वर्षे मी एक सिद्धांत सातत्याने मांडतो आहे तो म्हणजे या देशांमध्ये सर्वात प्रथम मोक्ष अध्ययावत म्हणजेच अपडेट होत असतो नवता आणत असतो आणि त्यामागे मग धर्म काम अर्थ येतात प्रमोद कोपर्डे या माझ्या मित्रवर्यांनी हा सिद्धांत मी अधिक तपशिलात मांडावा अशी विनंती केल्याने इथे थोडक्यात लिहितो आहे वास्तविक माझ्या इतर लेखनात तो अनेकदा आलेला आहे असो 


भारतातल्या सर्व क्रांत्या या मोक्षापासून सुरु होतात याचे कारण उघड आहे भारतीय लोक आणि भारतीय संस्कृती ह्या मोक्ष प्रधान आहेत इथे माणसांना लुप्तपणे ,गुप्तपणे ,सुप्तपणे प्रकटपणे आणि जागृतीत मोक्षच दिसत असतो अगदी भारतीय बहुतांशी समाजवादीसुद्धा गांधीवादाकडे अनेकदा वळलेले दिसतात त्याचे कारण त्यांना असलेले मोक्ष विषयीचे सुप्त आकर्षण ! हे आकर्षण कोणाला चुकत नाही इतके ते आपल्या जेनेटिक कोड मध्ये मुरलेले आहे या देशातली नीतिमत्ता ही कधीच धर्मावर अवलंबून नसते तर ती कायमच मोक्षावर अवलंबून असते आणि म्हणूनच जेव्हा स्वतःला मोक्षस्त्री अथवा मोक्ष पुरुष म्हणून घेणारे लोक सामाजिक आणि राजकीय जीवनात येतात तेव्हा ते प्रभावी ठरवून भारताची नैतिकता उंचावतात आणि जेव्हा सामाजिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोक्षबाबतचे भंपक लोक येतात तेव्हा भारतही नैतिकदृष्ट्या ढासळलेला असतो आजही भारतात मोक्ष पुरुष किंवा मोक्ष स्त्रिया नैतिक बाबतीत ढासळतात तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या ढासळण्यावर ताबडतोब चर्चा होते अर्थात कधी कधी उलटही होते उदाहरणार्थ महात्मा गांधी किंवा संत तुकाराम किंवा बसवेश्वर जे मोक्षलोक धर्माला अडथळे वाटतात त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना खाली खेचायला बघणारे विरोधकसुद्धा असतात हे प्रथम खोटे आरोप करतात मग चारित्र्यावर शिंतोडे उडवतात आणि त्यानेही काम साधले नाही तर त्या व्यक्तीला संपवतात वर आणि कांगावा करतात की आम्ही काय असे केलेले नाही त्यांची ही स्वतःची स्ट्रॅटेजी असते कारण त्यांना माहीत असते की या माणसाचा प्रभाव पुढे समाजावर पडणार आहे महात्मा गांधींच्या वरच एवढी टीका का या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या मोक्षप्रधानतेत आहे त्यांनी शोधलेला राजकीय मार्ग हा प्रामुख्याने मोक्षा मधून जन्मलेला आहे कारण मोक्षानेच शिलता ही संकल्पना जन्माला घातलेली आहे मी स्वतः द्वादशशितेचा शीलतेचा प्रचार प्रसार करत असतो आणि माझ्या आधीही तो अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे पंचशील ही तर भारताची भारतीय संविधानाची कणा आहेत आणि ती मोक्षातून म्हणजेच निर्वानातून किंवा कैवल्यातून आलेली आहेत 


मोक्ष मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या संस्कारामधून मुक्त व्हावे लागते या संस्कारात कौटुंबिक, वैयक्तिक , सामाजिक, राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक आणि राष्ट्रीय असे संस्कार येतात मोक्ष मिळवण्यासाठी या सर्व संस्कारांच्या मधून मुक्त व्हावे लागते त्याशिवाय मोक्ष किंवा निर्वाण किंवा कैवल्यप्राप्ती मिळतच नाही पण अशा प्रकारची मुक्तता एकदा लाभायला लागली की माणसे थेट स्वतःचे वर्तमानयुग बघायला लागतात आणि साहजिकच आपोआपच अद्ययावत होत जातात साहजिकच ही अद्ययावता त्यांच्या बोलण्यातून यायला लागते ते तिची सांगड मोक्षाशी घालून बोलायला लागतात भारतातले सगळे क्रांतिकारक बदल हे मोक्ष मिळवलेल्या लोकांनी सुरू केलेले आहेत त्याचे खरे कारण हे आहे भारतात धर्म संस्कारांनी जखडून टाकतात आणि मोक्ष त्या संस्कारातून मुक्त करत राहतात भारतात गेली कित्येक वर्षे यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष चालू आहे आणि धर्म नेहमीच मोक्षाची वाट अडवत मोक्षाच्या आडवा उभा आहे 


भारतात जेव्हा वैदिक परंपरा ही ब्राह्मण परंपरा म्हणून सनातन कर्मठ होत गेली तेव्हा तिच्याविरुद्धचे पहिले बंड हे मोक्षानेच केलेले आहे नकुलिश ,कपिल, महावीर आणि गौतम बुद्ध हे सर्वच्या सर्व मोक्षवादी लोक होते आणि यांनीच बंड केलेले आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे


भारतातली पुरोगामी क्रांती ही युरोपच्या आधीच अस्तित्वात आली कारण भारतातच बसवेश्वर नावाचे मोक्षपुरुष जन्मले ज्यांनी मोक्ष हा आकाशातून थेट जमिनीवर आणला सांस्कृतिक धार्मिक सामाजिक परिवर्तनात तो उभा केला आणि सामाजिक परिवर्तन कोणत्या दिशेने झाले पाहिजे राजकीय परिवर्तन कोणत्या दिशेने झाले पाहिजे श्रमाला प्रतिष्ठा कशी मिळाली पाहिजे याची पूर्णपणे नवी मांडणी केली जी बीज रुपाने मूळ शैवधर्मात होती आद्य शंकराचार्याना विरोध केला पाहिजे हे सर्वात प्रथम कळलेले फक्त बसवेश्वरच होते साहजिकच त्यांना प्रचंड विरोध झाला आणि शेवटी कदाचित त्यांची हत्या झाली. आंतरजातीय विवाहापासून नैतिक राजकीय तत्व ज्ञानापर्यंत श्रमाच्या प्रतिष्ठेपासून योग्य ते वेतन देण्यापर्यंत बसवेश्वर आणि त्यांच्या राजाच्या राजवटीत त्यांनी अनेक सुधारणा केल्या होत्या त्यासाठी अनुभव मंडप आणि कल्याण मंडप यांची स्थापना केली होती या सुधारणा कर्मठ ब्राह्मणांना रुचल्या नाहीत आणि त्यातूनच बसवेश्वरांच्या अनुयायांच्यावर प्रचंड हल्ले झाले बसवेश्वर यांचे हे मोक्ष केंद्री काम महाराष्ट्राने वारकरी चळवळ उभा करून थांबवले आणि सगळ्या देशाचा सत्यानाश केला अन्यथा युरोप आधीच सुरू झालेली ही प्रबोधनाची चळवळ राष्ट्रव्यापी चळवळ बनली असती आणि संपूर्ण भारताचा आयामच वेगळा झाला असता आज दक्षिणात्य राज्ये ही अधिक पुढारलेली वाटतात कारण तिथे बसवेश्वरांच्या मुळे आधीच पुरोगामी वाद आला महाराष्ट्रात सुद्धा शिवाजी महाराजांचे घराणे जे दाक्षिणात्य होयसाळ घराणे होते आणि ज्याचा विसर अलीकडे महाराष्ट्राला पडलेला आहे त्यांची अशी गैरसमजुत करून देण्यात आलेली आहे की हे घराणे राजपूत होते मराठी पुरोगामी वादाला सुरू करणारे होते त्यांनीच हर हर महादेव आणि जय शिवजी जय भवानी अशी घोषणा देत या पुरोगामी वादाची सुरुवात केली होती शिवाजी महाराज हे मराठी पुरोगामी वादाचे आद्यबिंदू आहेत हे अजूनही महाराष्ट्राला कळालेले नाही एक गोष्ट लक्षात घेण्याजोगे आहे की शिवाजी महाराजांना सुद्धा मोक्षाचेच आकर्षण होते त्याने अनेकदा जर मी राजा झालो नसतो तर मी मोक्षाच्या मागे लागलो असतो असे सुचवलेले आहे महाराजांचा सेक्युलरिझम हा मोक्षातून जन्मलेला आहे धर्मातून नव्हे हे आता महाराष्ट्राला सांगावेसे वाटते


अर्थात ही चळवळ महाराष्ट्रात वारकरी चळवळीने थांबवली जी धर्म केंद्री होती अर्थात तरीही मोक्ष मिळवणारे संत झालेच मात्र हे संत बसवेश्वरांच्या सारखे कधीही पुरोगामी राजकीय सांस्कृतिक आर्थिक सामाजिक क्रांतीचे प्रवर्तक झाले नाहीत ही त्यांची मर्यादा होती आज वारकरी चळवळीमुळेच महाराष्ट्र दक्षिणे पासून तुटला आहे अगदी मराठीत अभिजात भाषेच्या प्रश्नावर नेमाडे यांनी तमिळ लोकांनी हा उद्योग सुरू केला अशी टीका केलेलीच आहे ती टिपिकल वैष्णव आहे वैष्णव लोक असे कायमच उद्योग करत असतात आणि महाराष्ट्राला भटकवत असतात म्हणजे विठ्ठल मंदिर त्यामुळेच नवे केले जाते मराठी संस्कृती शिवाजी महाराज की जय असे म्हणत असली तरी प्रत्यक्षात तिने शिवाजी महाराजांच्या तत्त्वज्ञानाकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यांनी आणलेल्या पुरोगामी क्रांतीकडे दुर्लक्ष केलेले आहे कारण ती शैव क्रांती आहे वैष्णव नाही 


भारतीय आधुनिकतेची सुरुवात ही सुद्धा काडसिद्धेश्वर आणि जे कृष्णमूर्ती यांनी केलेली आहे यातील काडसिद्धेश्वर यांची मांडणी लिखित स्वरूपात आता उपलब्ध नसल्याने त्यांचे मॉडेल फक्त उभे आहे आणि याच मॉडेल मधून पुढे निसर्गादत्त महाराज उभे राहिलेले दिसतात ज्यांच्याकडे पुन्हा एकदा महाराष्ट्राने दुर्लक्ष केले कारण ते ब्राह्मण नव्हते हाच त्यांचा मोठा गुन्हा आहे त्यांनी मराठी आधुनिक वाद उभा केलेला दिसतो ज्यात वेदांत आणि शैव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात जे कृष्णमूर्तींच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय आहे कारण शेवटी ते ब्राह्मण आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी त्यांच्या बाबत मात्र प्रचंड उत्साह दाखवलेला आहे पाश्चात्त्य देशात वाढल्यामुळे जे कृष्णमूर्तींच्या विचारात एक युरोपियन धाटणी आलेली दिसते त्यांनी अनेक मोक्ष केंद्री क्रांतिकारक विचार मांडलेले आहेत जे अस्तित्ववादाला अधिक पुढे घेऊन जातात आणि भारताचे स्वतःचे आधुनिक मोक्ष प्रधान अस्तित्व केंद्री मॉडेल उभे करतात जर महात्मा गांधींनी जे कृष्णमूर्ती आत्मसात केले असते तर कदाचित त्यांची मांडणी अधिक आधुनिक झाली असती पण तसे झाले नाही आणि ती कायमच पुरोगामी अधिक आणि आधुनिक कमी राहिली कारण समकालीन मोक्षवादी विचारवंतांशी त्यांचे नाते नव्हते अगदी रमण महर्षीशीसुद्धा त्यांना फार जुळवता आलेले नाही 


मुळातच जे कृष्णमूर्ती हे भारतातील वैष्णव परंपरेशी खटकून असल्याने आणि आगाम परंपरेशी अधिक जुळवून घेणारे असल्याने कदाचित ते महात्मा गांधींना आकर्षित करू शकले नाहीत मात्र आधुनिक कालखंडातले सगळे प्रश्न विशेषत: मनाचे प्रश्न जे कृष्णमूर्ती यांनी सर्वप्रथम चर्चेला घेतलेले दिसतात त्यांच्यावर त्यांच्याबरोबर सखोल चर्चा होताना दिसते शेवटी शेवटी तर ते कॅम्पुटर रिवोल्युशन पर्यंत आलेले दिसतात त्यांच्या नंतर आधुनिक म्हणावे तसे किती विचारवंत निर्माण झाले असा प्रश्नच विचारावासा वाटतो भारताचा आधुनिक वाद हा कधीही पुरोगामीवादापासून मुक्त झाला नाही आणि त्याचे अनेक दुष्परिणाम भारताच्या आधुनिकीकरणावर झालेले आहेत दुर्दैवाने ही गोष्ट अनेकांना कळलेली दिसत नाही


भारतातील उत्तर आधुनिक मांडणी ही रामकृष्ण परम हंसांच्या पासून सुरु होते त्यांचा मोक्षवाद हा तंत्रातून जन्मलेला आहे आणि ते उघड उघड कालीचे भक्त आहेत आणि शाक्त ही आहेत 


उत्तर आधुनिक मांडणीतले बहुसांस्कृतिकवाद , तंत्र केंद्रीयता किंवा मेगा स्ट्रक्चरला आव्हान पुरोगामी बुद्धिवादाला आव्हान यासारखे अनेक विचार हे त्यांनी तंत्र केंद्री पद्धतीने मांडलेले होते दुर्दैवाने त्यांची मांडणी स्वामी विवेकानंद यांनी वेदांताच्या चौकटीत बसवण्याचे प्रयत्न केला आणि त्यांचे विषयी अनेक गैरसमज पण पसरले पण ज्यांना तंत्र परंपरा माहिती आहे आणि त्यांचे तंत्र परंपरा मांडणाऱ्या लोकांशी जे संवाद झालेले आहेत ते माहिती आहेत त्यांना त्यांची तांत्रिक बीजे नीट माहिती आहे रामकृष्ण परमहंस यांनी मोक्षाकडे जाण्याची अनेक तंत्रे असू शकतात अशी मांडणी करून स्वतः त्या संदर्भात अनेक प्रयोग केले. अशाच प्रकारचे प्रयोग नंतर भगवान रजनीश यांनी केले एका अर्थाने रामकृष्ण परमहंस यांनी सुरू केलेल्या उत्तराधुनिक मांडणीला सर्वोत्कृष्ट व्यापक बनवले ते ओशो रजनीश यांनी आणि अलीकडे सद्गुरूंनी पुन्हा एकदा ही मांडणी शैव करून तिला व्यवस्थित पूर्णविराम दिलेला आहे एक वर्तुळ पूर्ण केलेले आहे ते एका अर्थाने शेवटचे उत्तर आधुनिक भारतीय विचारवंत आहेत 


या सर्व लोकांनी अनेक उत्तराधुनिक प्रश्नांची चर्चा केलेली दिसते उत्तराधुनिक लोक परंपरेची नव्याने मांडणी करतात आणि परंपरेशी अतिशय व्यवस्थितपणे जुळवून घेतात रजनीश्यांनी फक्त परंपरा समजून घेतली नाही किंवा फक्त जुळवून घेतले नाही तर तिला कसे नवे करता येते हेही दाखवून दिले त्यांनी सर्व मुक्त झालेल्या पुरुषांची वचने विश्लेषणाच्या चौकटीत आणून त्या पुरुषांना आणि स्त्रियांना आद्ययावत करून टाकले म्हणजेच भारतीय उत्तर आधुनिकतेचे मॉडेल जर का आपणाला तपासायचे असेल तर पुन्हा एकदा या मोक्षवादी लोकांच्याकडेच यावे लागते रामकृष्ण परमहंस हा जर आरंभ असेल तर ओशो रजनीश आणि सद्गुरु हेच या मांडणीचे उत्तर अधिकारी आहेत हे लोक जितक्या सहजपणाने समकालीन वास्तवाशी जुळवून घेताना दिसतात तसे कोणी दिसत नाही गांधीवादावर आणि समाजवादावर म्हणजेच भारतातल्या दोन मेटॅनॅरेटीववर सर्वाधिक सखोल चर्चा ओशो रजनीश यांनी केलेली आहे त्यांचे समाजवादसे सावधान हे पुस्तक प्रचंड गाजलेले होते. गांधीवादाचे वाभाडे त्यांनीच काढले ही पुरोगामीवादावरची पहिली रोखठोक टीका होती आणि ती उत्तराधुनिक पद्धतीने केली गेलेली होती अगदी आंबेडकरांनाही मोक्ष मिळालेल्या नाही हे स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगणारे ओशो रजनीशच होते थोडक्यात काय ज्या वेळेला पोस्ट मॉडर्न हा शब्द सुद्धा भारतीयांना माहित नव्हता तेव्हा ओशो रजनीश भारतीय पद्धतीचा पोस्ट मॉडर्निझम सादर करत होते अर्थात त्यामागे रामकृष्ण परमहंस यांच्या विषयीचा आदर होताच आणि त्यांनी तो अनेकदा व्यक्त केलेला आहे आणि कधी कधी हा आदर व्यक्त करताना त्यांनी स्वामी विवेकानंदांच्यावर सुद्धा प्रचंड टीका केलेली दिसते कारण तेच एकमेव असे होते ज्यांना विवेकानंदांनी रामकृष्ण यांना सपाट केलेले आहे याची जाणीव होती अर्थात केवळ स्वामी विवेकानंद नव्हे तर प्रबोधनातल्या सर्वच मुख्य लोकांच्यावर त्यांची टीका कोसळताना दिसते भारतातल्या पुरोगामी प्रोजेक्टवर सर्वात पहिले उत्तर आधुनिक आघात हे ओशो रजनीश यांनी केलेले आहेत ते जर का पुरोगामी लोकांनी नीट वाचले असते तर अनेक गोष्टी त्यांना नीट कळल्या असत्या माझा पोस्टमॉडर्न विचारसरणीला जो विरोध आला त्याचे कारण मी कॉलेज वयातच ओशो रजनीश्यांच्या विरोधात गेलो हेच आहे


श्रीधर तिळवे नाईक

No comments:

Post a Comment